प्रश्न २ ( अ ) आणि ( इ) यांत दिलेल्या पठित कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कोणत्याही दोन कवितांची नावे दिली जातील. त्यांपैकी कोणत्याही एका कवितेवर पुढील मुद्द्यांपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करणे अपेक्षित आहे :
खालील ८ कृतींपैकी कृतिपत्रिकेत १-१ गुणांच्या २ कृती आणि २ गुणांची कोणतीही एक कृती १ कृती विचारली जाईल.उत्तराच्या सुरुवातीला तुम्ही निवडलेल्या कवितेचे नाव लिहिणे आवश्यक आहे.
कविता : उत्तमलक्षण
( संतकाव्य )
|
प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.
प्रस्तुत कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ : जसे - (i) होड ➡ पैज (ii) दृढ ➡ ठाम.
( परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे. इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
( परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
जसे - अपकीर्ति ते सांडावी सत्कीर्ति वाडवावी ॥
विवेकें दृढ धरावी वाट सत्याची ।।
उत्तर: रामदास श्रोत्यांना शिकवण देताना म्हणतात- आपली कुप्रसिद्धी टाळावी, चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. सारासार विचाराने, विवेकशील वर्तन करून ठामपणे सत्याचा मार्ग आचरावा.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे. त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. म्हणून कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे.. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
मला ही कविता खूप आवडली. कवितेत मांडलेले विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत. कुठेही राज्यांचा बोजा नाही. प्रत्येक शब्दाणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.
प्रस्तुत कवितेचे कवी : द. भा. धामणस्कर
प्रस्तुत कवितेचा विषय : निर्जीव वस्तूंचा सजीवपणा
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
( परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) स्नेह ➡ प्रेम (ii) हक्क ➡अधिकार (iii) मन➡ चित्त
(iv) सेवक ➡ चाकर (v) काळ➡ समय (vi) आयुष्य ➡ जीवन
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
माणसाने वस्तूंशी प्रेमानेच वागले पाहिजे. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मार्ग शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की वस्तूंना टाकून देऊ नये. त्यांना टाकून देणे म्हणजे आपले अस्तित्व आपण स्वतः संपवून टाकणे. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो. कवींच्या मते, त्यांना मन असते, , भावना असते. त्या संवेदनशीलही असतात. त्यांच्या दर्शनाने त्या वापरणाऱ्याचे व्यक्तिमत्त्व लक्षात येते. म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने, आत्मीयतेने वागले पाहिजे, आपण माणसांशी वागतो, तसेच वस्तूंशी वागले पाहिजे, असा महत्त्वाचा विचार या कवितेतून मांडला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
( परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही.
उत्तर : कवी म्हणतात –वस्तूंना जीव असतो, मन असते. म्हणून त्यांना जपणे गरजेचे आहे. त्यापुढे त्यांचे आपण लाडही करावेत; कारण पुढच्या काळात आपल्यातले प्रेम त्याच कायम जिवंत ठेवणार आहेत.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
या कवितेची रचना मुक्तछंदातील आहे. मुक्तछंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतीही बंधने येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगत्या वापरता येते. या कवितेत तसेच घडले आहे. दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे या कवितेचा वाचकांशी सहजसंवाद घडतो. साध्या पण आवाहक शब्दांतून मोठे तत्त्व येथे व्यक्त होते. अत्यंत हळुवार, संवेदनशील भावना कवी नेहमीच्याच साध्या शब्दांतून व्यक्त करतात.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे
ही कविता सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशी आहे. एक वेगळाच चाकोरीबाहेरचा विचार कवींनी या कवितेतून मांडला आहे. सहसा आपण वस्तू व ती वापरणारा माणूस यांना वेगळे वेगळे मानतो. वापरकर्त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप घडते. म्हणजे वस्तूवरून वापरकर्त्याचे मन कळते. आपण वस्तूशी प्रेमाने वागतो. म्हणजे स्वतःशीच प्रेमाने वागत असतो, असा वेगळा नावीन्यपूर्ण भाव या कवितेतून व्यक्त होतो. म्हणून ही कविता मला आवडते.
प्रस्तुत कवितेचे कवी : नीरजा.
प्रस्तुत कवितेचा विषय : स्त्री-पुरुष समानता
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) हात ➡ हस्त (ii) कसब ➡ कौशल्य
(iii) आभाळ ➡ आकाश (iv) आश्चर्य ➡ नवल
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
आजपर्यंत आपण स्त्रियांना दुय्यम मानून वागत आलो. हे आता खूप झाले. आता हे थांबले पाहिजे. येणारा काळ हा स्त्री-पुरुष समानतेचा काळ आहे. त्या काळाला साजेसे जीवन जगण्यासाठी आपल्याला आता स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व अंगीकारावे लागणार आहे.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
अजूनही समाजाने पूर्णपणे स्त्री-पुरुष समानता अंगीकारलेली नाही. हे निराशाजनक आहे. परंतु भावी काळ हा स्त्री-पुरुष समानतेचाच हे असणार आहे. म्हणून सर्वांनी स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे, असा विचार या कवितेतून मांडला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
उत्तर : तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू पुरुष संसारातील घरगुती कामेही करतील, असा आशय व्यक्त होतो.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
ही मुक्तछंदातली कविता आहे. मुक्तछंदामुळे दैनंदिन व्यवहारातली भाषा कवितेत वापरली गेली आहे. साध्या विधानांतून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात. लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे. या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री-पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो. 'हातात हात असेल' या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्ययकारकतेने प्रकट होते.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
ही कविता मला खूप आवडली आहे. ही आजची, आमच्या पिढीची कविता आहे. आमच्या मनातला भाव, आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात. आम्ही आपापसात वागतो, तेव्हा मुलगा-मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो. श्रेष्ठ-कनिष्ठभाव न बाळगता आम्ही वावरत असतो. आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करते.
प्रस्तुत कवितेचे कवी : मोरोपंत.
प्रस्तुत कवितेचा विषय : सज्जन माणसाचे महत्त्व
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) संगत ➡ सोबत (ii) कलंक ➡ डाग (iii) मती ➡ बुद्धी
(vi) मुख ➡ तोंड. (iv) वियोग ➡ विरह (v) चित्त ➡ मन
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
नेहमी संतसज्जनांच्या संगतीत राहावे. त्यांच्या सहवासामुळे चांगले वागण्याचे दर्शन घडते. त्यांच्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्या विचारांसारखे विचार आपण अंगीकारू लागतो. तसेच नेहमी देवाचे नामस्मरण करीत राहावे. म्हणजे वाईट कल्पना, वाईट विचार आपल्या मनाला शिवत नाहीत.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
माणसाने सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. दुरभिमान, गर्विष्ठपणा, वाईट विचार आपल्या मनातून नष्ट झाले पाहिजेत. चांगल्या विचारांचे वळण लागावे अशी मोरोपंत इच्छा व्यक्त करतात. चांगले वागणे म्हणजे हे समजून घेण्यासाठी सदोदित सज्जनांच्या संगतीत राहावे. लोकांनी सज्जनांचे वागणे, त्यांचे बोलणे, त्यांचे विचार अंगीकारावेत, काय, हा विचार या कवितेत मांडला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
उत्तर : चारित्र्यसंपन्न होण्यासाठी नेहमी सज्जन माणसांशी मैत्री करावी. सुविचार, सुवचने यांचे श्रवण करावे. बुद्धीमधील वाईट विचार नष्ट करावेत. कामभावनेची नावड निर्माण होवो.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
ही कविता आर्या या वृत्तात लिहिलेली आहे. या आर्याची चालही जनमानसात खूप लोकप्रिय झालेली आहे. कर्णमधुर चालीमुळे ही कविता गुणगुणत राहावीशी वाटते. या कवितेत 'सुजनवाक्य', 'सदंघ्रिकमळी', 'कुजनविघ्नबाधा', 'सदुक्तमार्गी', 'स्वतत्त्व', 'कुशलधामनामावली' यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द आहेत. अशा शब्दांनी भारदस्तपणा येतो. त्याचबरोबर 'घडो', ‘पडो', 'जडो', 'मुरडिता', 'इटाने', 'ढळो' यांसारखे अस्सल मराठी शब्दही या कवितेत आढळतात. त्यामुळे आशय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते. भाषा आवाहक बनते. यमकप्रधानता असल्यामुळे सुंदर लय व खटकेबाज नादमयता निर्माण झाली आहे.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
ही कविता मला आवडते. कारण लहानपणापासून मी ती ऐकत आलो आहे. लहानपणी ती पाठही केली होती. आता मोठा झाल्यावर कवितेचा अर्थ कळला आहे. कवितेत चांगले वागण्याचा सल्ला दिला आहे. पण चांगले म्हणजे काय, हे सोप्या पद्धतीने सांगितले आहे. सज्जन माणूस जसे वागतो, बोलतो, विचार करतो, तसे म्हणजे चांगले, इतकी सोपी कल्पना वापरून आपले म्हणणे सांगितले आहे. पण या कवितेतील संस्कृतप्रचुर शब्दांमुळे अर्थ कळण्यात अडचणी येतात. ही एक कवितेविषयी नावड निर्माण करणारी बाब आहे.
प्रस्तुत कवितेचे कवी : आसावरी काकडे.
प्रस्तुत कवितेचा विषय : स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) पाणी ➡ जळ (ii) धीर ➡ धैर्य (iii) सारी ➡ सर्व
(vi) तळे ➡ तलाव (iv) गाणे ➡ गीत (vii) झरा ➡ निर्झर
(viii) उमेद ➡ जिद्द (ix) बळ ➡ शक्ती. (v) पान ➡ पर्ण
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाने व यशाने भरलेला नसतो. खरे तर सदोदित अडचणीच असतात. या अडचणींना घाबरून आपण खचून जाता कामा नये. थोड्याशा प्रयत्नानेही यश मिळेल, असा सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. जग अगदीच वाईट नाही; किंवा सगळीकडे वाईटपणा वा खोटेपणाच भरलेला आहे, असे मानू नये. प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असा संदेश या कवितेतून मिळतो.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
जीवनात खूप कष्ट उपसावे लागतात, तरीही अनेकदा यश हुलकावणी देते. कधीही प्रयत्न केल्याबरोबर वा कष्ट घेतल्याबरोबर लागलीच यश मिळत नसते. माणसे त्यामुळे नाउमेद होतात. असे माणसाने कधीच नाउमेद होऊ नये. सतत प्रयत्न करीत राहावे. आपल्याला यश मिळेलच अशी आशा बाळगावी, असा विचार या कवितेतून व्यक्त केला आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे !
उत्तर : खोलवर आणखी थोडे खोद म्हणजे तुला निर्मळ झरा नक्कीच लाभेल. उमेदीने जगण्यासाठी मनाची शक्ती हवी. समृद्ध जीवन जगण्यासाठी आत्मबळ गरजेचे आहे.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
प्रत्येक चरणात आठ अक्षरे, दुसऱ्या व चौथ्या चरणांत यमक आणि प्रत्येक कडव्यात चार चरण अशी या ओवीची रचना असते. कवितेला आपोआपच गेयता लाभली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे. 'सारी खोटी नसतात नाणी या शब्दांतून आशावाद व्यक्त होतो. संपूर्ण कविताच आशावाद भारलेली आहे. 'मरणाचे कष्ट घ्या', 'प्राण गेले तरी चालेल' अशा शब्दांतून प्रयत्न करायला सांगितले तर दडपण येते. 'जरासा प्रयत्न कर, थोडेसे कष्ट घे', असे सांगितले की माणूस कष्ट करायला सिद्ध होतो. या कवितेतील प्रत्येक कडव्यातील शेवटच्या दोन ओळी मनात अशी उमेद निर्माण करतात.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
ही कविता मला खूप खूप आवडली आहे. ही कविता वाचता वाचता मनातील निराशेचे मळभ दूर होत. प्रयत्न करीत राहण्यातच यशाचा मार्ग आहे, हे मनोमन पटते. थोड्याशा प्रयत्नाने, थोड्याशा बळानेही उमेद निर्माण होते. या शब्दांनी मनाला उभारी येते. ही कविता माणसाला चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते.
प्रस्तुत कवितेचे कवी : जगदीश खेबुडकर
प्रस्तुत कवितेचा विषय : स्वसामर्थ्य व स्वातंत्र्य मोलाचे असते.
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) आकाश ➡ आभाळ (ii) सोने ➡ सुवर्ण (iii) वैभव ➡ समृद्धी (iv) माया ➡ प्रेम
(v) काया ➡ शरीर (vi) विहार ➡ संचार (vii) सामर्थ्य ➡ शक्ती (viii) डोंगर ➡ पर्वत
(ix) सरिता ➡ नदी (x) सागर ➡ समुद्र (xi) कष्ट ➡ श्रम (xii) व्यथा ➡ दुःख.
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
माणसाने कष्टावर, प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे. 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' असे मानू नये. नशिबाने काहीही मिळत नाही. प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. तसेच, केवळ देहाला तृप्त करणारी सुखे महत्त्वाची नसतात. ती तात्कालिक असतात. ती चिरकाल टिकत नाहीत. आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे. त्यातच खरे सुख असते; असा संदेश ही कविता देते.
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
माणसे अनेकदा देवाच्या आहारी जातात. नशिबावर भरवसा ठेवतात. नशिबात असेल, तेच मिळेल; अधिक काहीही मिळणे शक्य नाही, अशी त्यांची ठाम समजूत असते. कवी जगदीश खेबुडकर ही समजूत दूर करायला सांगतात. त्यांच्या मते, माणसाने स्वतःचे सामर्थ्य ओळखले पाहिजे आणि कठोर परिश्रमांना सिद्ध झाले पाहिजे. कठोर परिश्रम केले, तर यश नक्कीच मिळते. प्रयत्नवाद हाच खरा विचार आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
उत्तर : कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. आयते सुख कधी मिळत नाही. तुला हे समजते पण वागणुकीत दिसत नाही. म्हणून मनातल्या मनात दुःख जळत राहते. त्यामुळे तुझा प्राण कावराबावरा होऊन घाबरतो.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे पारतंत्र्याचे प्रतीक, तर पंख हे मुक्तपणे आकाशात विहार करण्याचे प्रतीक, दया डोंगर, सरिता सागर ही सर्व अडचणींची प्रतीके. सर्वसामान्य लोकांना सहज कळतील, आशय थेट मनाला भिडेल, अशी ही सोपी, साधी प्रतीके कवींनी वापरली आहेत. फळ रसाळ मिळते' याप्रमाणे अनुप्रासांचा सुंदर उपयोग केलेला आहे. एकूण ही कविता रसाळ, प्रासादिक बनली आहे.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
ही कविता म्हणजे एक गाजलेले चित्रपट गीत आहे. त्याची चाल, संगीत चांगले आहे. गीत ऐकत राहावे असे वाटते. गीत दमदारपणे गायलेले आहे. ते लक्षातही राहते. हे गीत माणसाला परावलंबित्वाचा त्याग करण्याची प्रेरणा देते. पारतंत्र्य जरी सुखाचे वाटत असले, तरी स्वसामर्थ्याने मोकळ्या आकाशात झेप घ्यावी आणि स्वकर्तृत्व गाजवावे, हे अगदी सहज-सोप्या शब्दांत या गीतामध्ये सांगितले आहे. म्हणूनच हे गीत, ही कविता मला आवडते.
कविता - तू झालास मूक समाजाचा
नायक
|
प्रस्तुत कवितेचे कवी : ज. वि. पवार.
प्रस्तुत कवितेचा विषय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे माहात्म्य.
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणतेही दोन शब्द दिले जातील त्यांचा अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
(i) काळोख ➡ अंधार (ii) खळगा ➡ खड्डा (iii) सूर्य ➡ रवी
(iv)नायक ➡ कप्तान (v)युद्ध ➡ संग्राम (vi) संगीन ➡ बंदूक
(vii) पृथ्वी ➡ अवनी (viii)थंड ➡ गार.
प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :
अज्ञान, दारिद्र्य, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला. प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली. पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे. तो थंड झाला आहे. तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व ताकदीनिशी उठावे आणि पुन्हा एकदा विषमतेविरुद्ध लढ्याला सिद्ध व्हावे, अशी इच्छा कवी व्यक्त करतात. हाच या कवितेचा संदेश आहे
प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :
पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या चिखलात खितपत पडलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेर काढले. त्याला आत्मविश्वास दिला. स्वतःच्या पायावर उभे केले. संपूर्ण दलित समाज त्या वेळी बाबासाहेबांच्या पाठीशी उभा राहिला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला दलित चळवळीला तेज प्राप्त करून दिले. पण आता मात्र तोच दलित समाज थंड झाला आहे. त्याचे बाबासाहेबांनी मिळवून दिलेले तेज आता विरून गेले आहे.. याविषयीची खंत कवींनी या कवितेत व्यक्त केली आहे.
कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :
(परीक्षेसाठी कवितेतील कोणत्याही दोन ओळी दिल्या जातील त्या ओळींचा सरळ अर्थ लिहिणे अपेक्षित आहे.)
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.
उत्तर : चवदार तळ्याच्या संग्रामाला पन्नास वर्षे उलटून गेल्यावर कवी डॉ. आंबेडकरांना उद्देशून म्हणतात- सुख-समृद्धीचे प्रतीक असलेली सूर्यफुले अजून तुमचा ध्यास घेत आहेत. संघर्षाला प्रवृत्त करणारा बिगूल अजून तुमची वाट पाहत आहे. संघर्ष मावळलेला आहे, कारण चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे. ते पुन्हा पेट घेईल.
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :
कविता मुक्तछंदात आहे. 'तू परिस्थितीवर स्वार झालास', 'इतिहास घडवलास', 'रणशिंग फुंकलेस', 'गुलामांच्या पायातल्या बेड्या तोडल्यास', 'आकाश हादरलं', 'पृथ्वी डचमळली', 'चवदार तळ्याला आग लागली' यांसारख्या लढवय्या शब्दप्रयोगांनी कविता ओजस्वी बनली आहे. पूर्वी दलित समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली खवळून उठला होता. तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये खळबळ माजली होती. हे 'चवदार तळ्याला आग लागली' या शब्दांतून प्रखरपणे व्यक्त होते, आता दलित समाज शांत झाला आहे, ही बाब 'चवदार तळ्याचे पाणी थंड झालं' या शब्दांतून व्यक्त होते.
प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
ही कविता अतिशय चांगली आहे. ओजस्वी शब्दांनी भरलेली आहे. कविता वाचता वाचता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महानता स्पष्ट होत जाते. त्यांनी दलित समाजाला दिलेल्या तेजाचा प्रत्यय येतो. शेवटच्या कडव्यात मात्र कलाटणी आहे. शेवटच्या कडव्याच्या आधीच्या कडव्यात प्रखर तेजाचा प्रत्यय येत राहतो. मात्र आता तोच दलित समाज शांत, थंड झाल्याची दुःखद जाणीव व्यक्त होते. ही दुःखद जाणीव शेवटच्या केवळ चार ओळींमध्ये व्यक्त झाली असतानाही आधीच्या जाज्वल्य भक्तीच्या पार्श्वभूमीवर मनाला व्याकूळ करते. हा दुःखभाव हाच या कवितेचा आत्मा आहे.
COMMENTS