जैसा वृक्ष नेणे, धरिला पंढरीचा चोर, या झोपडीत माझ्या, मी वाचवतोय
काव्यपंक्तींचे रसग्रहण
इयत्ता ९ वी-१० वीच्या कृतिपत्रिकेच्या नवीन, अदद्ययावत आराखड्यानुसार प्रश्न २ (३) हा कवितेच्या पंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतिपत्रिकेत ४ गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून, त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल :
- पठित पद्यांपैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही दोन पंक्ती देऊन, त्यांचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल.
- दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील तीन मुद्द्यांना अनुसरून तीन परिच्छेदांत रसग्रहण करणे अपेक्षित आहे :
(१) आशयसौंदर्य : यामध्ये कवीचे/कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील.
(२) काव्यसौंदर्य : यामध्ये दिलेल्या पंक्तींतील अर्थालंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहावी लागणार आहे. त्यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासावा.
(३) भाषिक वैशिष्ट्ये : यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे (ग्रामीण, बोलीभाषा, संवादात्मक, निवेदनात्मक, चित्रदर्शी यांपैकी कोणती), आंतरिक लय, नादमाधुर्य, अलंकार आदी मुद्द्यांना धरून माहिती यावी. हे मुद्देही प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील.
रसग्रहण लिहिण्याचा आराखडा (३ परिच्छेदांत उत्तर)
-
आशयसौंदर्य (१ला परिच्छेद)
-
कवीचे / कवितेचे नाव
-
कवितेचा मुख्य विषय व आशय
-
संदेश / उपदेश / मूल्ये
-
कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव
-
-
काव्यसौंदर्य (२रा परिच्छेद)
-
दिलेल्या पंक्तींच्या कल्पना, प्रतिमा, भाव
-
निसर्गदृष्टी / तत्त्वज्ञान / भक्ती / समाजदृष्टी
-
अलंकार, रस (उदा. भक्तिरस, शांत रस इ.)
-
पंक्तींतून व्यक्त झालेले विचार
-
-
भाषिक वैशिष्ट्ये (३रा परिच्छेद)
-
भाषाशैली (सोप्पी, सुबोध, ग्रामीण, निवेदनात्मक इ.)
-
छंद (अभंग, ओवी, मुक्तछंद इ.)
-
लय, नादमाधुर्य, अंतर्गत यमक
-
शब्दरचना व कवीची हातोटी
-
✔️ आशयसौंदर्य – कवितेचा संदेश स्पष्ट.
✔️ काव्यसौंदर्य – पंक्तींना धरून अर्थ, भाव, रस समजावून दिले.
✔️ भाषिक वैशिष्ट्ये – छंद, अलंकार, भाषाशैली योग्य रीतीने लिहिली.
कविता : जैसा वृक्ष नेणे
'निंदास्तुति सम मानिती जे संत ।
पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे ।।'
उत्तर :
आशयसौंदर्य : 'जैसा वृक्ष नेणे' या अभंगामध्ये संत नामदेव यांनी झाडाचे प्रतीक वापरून संत-सज्जनांची महती सांगितली आहे. संताचे वागणे मानापमान व निंदास्तुती यांच्या पलीकडचे असते. तशी आपली वागणूक ठेवावी स्थिर चित्ताने वर्तन करावे, हा संदेश या अभंगातून दिला आहे.
काव्यसौंदर्य : झाडाची पूजा केली किंवा झाड तोडले तरी झाडाला दुःख होत नाही. त्याला मान-अपमान वाटत नाही. संतसज्जन झाडासारखे असतात. निंदा व स्तुती त्यांना समान वाटते. स्तुतीने ते हुरळून जात नाहीत अथवा निंदेने नाराज होत नाही. ते पूर्ण धीरवंत व स्थिरबुद्धीने वागतात. अशा धैर्यवंत साधूंची गाठ पडणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होणे असते.
भाषिक वैशिष्ट्ये : 'अभंग' या प्राचीन लोकछंदात ही रचना आहे. पहिल्या तीन चरणात सहा व चौथ्या चरणात चार अक्षरे असा हा 'मोठा अभंग' छंद आहे. या रचनेत दुसऱ्या व तिसऱ्या चरणात यमक साधले आहे. झाडाचे सर्वमान्य प्रतीक वापरून साध्या, सुबोध भाषेत कवितेचा आशय पोहोचवला आहे. नेमके तत्त्व सांगून लोकमानसाला योग्य शिकवण सहजपणे देण्याची विलक्षण हातोटी शब्दांनी साधली आहे.
कविता : धरिला पंढरीचा चोर
'हृदय बंदिखाना केला।
आंत विठ्ठल कोंडिला ।।'
उत्तर :
आशयसौंदर्य : श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा 'धरिला पंढरीचा चोर' हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्याना मिळते.
काव्यसौंदर्य : श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावे म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : पहिल्या चरणात सात ते आठ अक्षरे आणि दुसऱ्या चरणात नऊ-दहा अक्षरे असणारा, दोन्ही चरणांत यमक असलेला, हा 'छोटा अभंगा'चा प्राचीन लोकछंद संत जनाबाईंनी सहजपणे अभिव्यक्त केला आहे. या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदिखान्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे. चोर, कैदखाना, मार देणे, बंदिस्त ठेवणे असे अनुक्रमे फुलत जाणारे भाव लोभस आले आहेत, शिवाय 'सोहं शब्दाचा मारा केला' यातील गहन तत्त्वज्ञान सहजपणे मांडले आहे. श्रीविठ्ठलाचा सहवास मिळावा म्हणून केलेले लटके भांडण नाट्यमयरीत्या साकार केले आहे.
कविता : या झोपडीत माझ्या
'पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या'
उत्तर :
आशयसौंदर्य : राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांनी या झोपडीत माझ्या' या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.
काव्यसौंदर्य : प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे. असे कवींना म्हणायचे आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा 'ओवी' हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे, की ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट-'या झोपडीत माझ्या' असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच 'या' हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही अंगाने अर्थवाही झाला आहे.
कविता : मी वाचवतोय
काव्यसौंदर्य : बदलत जाणाऱ्या समाजाचे वास्तव शब्दांत चितारताना प्रस्तुत ओळींमध्ये कवी म्हणतात की 'मम्मी-डॅडी' या उसन्या परिभाषेमुळे 'आई' अशी हाक आता ऐकू येत नाही. जणू ती हाक सीमेबाहेर गेली आहे. गोठ्यातल्या मायेचा वारसा असलेल्या गाईसुद्धा आता नैसर्गिक हंबरणे विसरल्या आहेत. त्या आता आपल्या वासरांसाठी हंबरत नाहीत. म्हणजेच आई-लेकरांचे संबंध मायाममतेचे राहिले नाहीत, ही खंत कवींनी व्यक्त केली आहे. भौतिक सुखामध्ये नैतिक मूल्यांची पायमल्ली होते, याची बोचणी प्रस्तुत ओळींमध्ये स्पष्टपणे दर्शवली आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : जुन्या मूल्यांविषयीची आस्था व नवीन महानगरीय बदलते वास्तव यांतील अंतर्विरोध कवीने चपखल शब्दांत मांडला आहे. कवितेची भाषा हृदयाला भिडेल अशी थेट व स्पष्टोक्तीपूर्ण आहे. यातील भावनांची आवाहकता प्रशंसनीय आहे. मुक्त गदय शैली आशयाला पूरक आहे. कवितेतील अंतर्गत यमक व सूचक शब्दांची मांडणी आशयाला उठाव देणारी आहे. योग्य परिणामकारकता शब्दाशब्दांत अभिव्यक्त झाल्यामुळे रसिक चिंतनशील होतात.
.png)
COMMENTS