वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.
इयत्ता दहावी _ इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
- इतिहासलेखनाची उद्दिष्टे
- इतिहास संशोधनाच्या मर्यादा :
(१) वैज्ञानिक ज्ञानशाखांप्रमाणे इतिहास संशोधनात प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा वापर करता येत नाही.
- वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा वापर करून सार्वकालिक नियम मांडणे शक्य होते.
- इतिहास संशोधनात घटना या इतिहासात म्हणजेच भूतकाळात घडून गेलेल्या असतात.
- या घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे हजर नसतो; त्यामुळे त्या घटनांची वर्तमानात पुनरावृत्ती करता येत नाही.
- एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालिक व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते.
म्हणून इतिहास संशोधनात विज्ञानातील प्रायोगिक पद्धती व प्रत्यक्ष निरीक्षण या पद्धतींचा वापर करता येत नाही.
(२) त्यामुळे इतिहासात सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे शक्य होत नाही.
(३) इतिहासात घटना घडून गेलेल्या असल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. त्यामुळे इतिहास संशोधनात मांडलेले निष्कर्ष व नियम पुनः पुन्हा सिद्ध करता येणे शक्य नसते.
- पुढील तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते :
(१) दस्तऐवजांतील भाषा व लिपी जाणणारे.
दस्तऐवज हा शब्द म्हणजे एखादी गोष्ट अधिकृतपणे लिहून ठेवलेला किंवा नोंदवलेला पुरावा, जो भविष्यात संदर्भासाठी, कायदेशीर कामासाठी, माहिती साठवण्यासाठी किंवा इतिहास लक्षात ठेवण्यासाठी वापरला जातो.
✅ दस्तऐवजची सोपी व्याख्या:
दस्तऐवज म्हणजे एखाद्या घटनेची, व्यवहाराची किंवा माहितीची लेखी नोंद.
(२) अक्षरांचे वळण व भाषाशैली कोणत्या काळातील आहे याचे जाणकार.
(३) दस्तऐवजांसाठी वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ जाणणारे तज्ज्ञ.
(४) अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे अभ्यासक.
जे अभ्यासक व्यक्तीच्या उभ्या राहण्याच्या, बसण्याच्या, हातवारे करण्याच्या, चेहऱ्यावरील भावनांच्या आणि संपूर्ण शरीराच्या हालचालींमधून ती व्यक्ती स्वतःला किती अधिकारशाली (dominant), आत्मविश्वासू किंवा असहाय्य समजते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात — त्यांना अधिकारदर्शक मुद्रांचा अभ्यास करणारे अभ्यासक असे म्हणतात.
(५) दस्तऐवजांतील संदर्भाचा, माहितीचा अभ्यास करणारे इतिहासतज्ज्ञ.
- इतिहास संशोधन पद्धतीच्या व मांडणीच्या पायऱ्या :
- इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणाऱ्या शाखा व संस्था :
- पुरातत्त्व शाखा
- अभिलेखागार संस्था
- हस्तलिखितांची अभ्यास – शाखा
- अक्षरवटिकाशास्त्र शाखा
- भाषारचनाशास्त्र शाखा
- नाणकशास्त्र शाखा
- वंशावळींचा अभ्यास.
- इतिहासलेखनाची परंपरा :
(१) इतिहासलेखन व इतिहासकार :
* इतिहासलेखन म्हणजे काय?
- उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे,
- त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे. त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
- उपलब्ध माहितीचे संदर्भ तपासून चिकित्सक संशोधन करणे.
- ऐतिहासिक माहितीच्या संदर्भात संभाव्य निष्कर्षांची मांडणी करणे.
.....या पद्धतीने केलेल्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखनपद्धतीला 'इतिहासलेखन' असे म्हणतात.
(२) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला 'इतिहासकार' असे म्हणतात.
- इतिहासलेखन :
- इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे; त्या भूतकालीन घटनांची तो निवड करीत असतो.
- इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्याचा वैचारिक दृष्टिकोन यांवर त्याची लेखनशैली निश्चित होत असते.
- प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती.
- वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमांच्या गोष्टी, कहाण्या, गीते व पोवाडे, गुहाचित्रे यांद्वारे भूतकालीन स्मृतींचे जतन केले जात असे.
- आधुनिक इतिहासलेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने झाली आहेत.
• फ्रान्समधील प्राचीन शिलालेख :
(२) सुमेर साम्राज्यातील राजांची युद्धे, संघर्ष यांच्या नोंदी व योद्ध्यांची चित्रे या शिलालेखावर कोरलेली आहेत.
(३) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली.
आधुनिक इतिहासलेखन :
आधुनिक इतिहासलेखनाची वैशिष्ट्ये :
- या लेखनपद्धतीत प्रश्नांची मांडणी सुयोग्य पद्धतीने होते; म्हणून ती शास्त्रशुद्ध असते.
- यातील प्रश्न हे मानवकेंद्रित असून, त्या काळात झालेल्या मानवी कृतींसंबंधात असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटना वा देवतांच्या कथांशी नसतो.
- या प्रश्नांच्या उत्तरांना विश्वासार्ह पुरावे असल्याने त्यांची मांडणी तर्कसुसंगत असते.
- मानवाने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासलेखनात घेतला जातो.
युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहासलेखन :
(१) इतिहासलेखनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास :
- अठराव्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रांत प्रगती झाली.
- वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांना वाटू लागले.
- अमेरिका-युरोप येथे इतिहास व इतिहासलेखन यांसंबंधी विचारमंथन झाले.
- इतिहासलेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले.
- या आधी होणाऱ्या ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञान यांऐवजी इतिहासाला महत्त्व आले.
- जर्मनीतील विद्यापीठे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली.
(२) अॅनल्स प्रणाली :
- विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये 'अॅनल्स' ही इतिहासलेखनाची नवी प्रणाली उदयाला आली.
- इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी, राजे व त्यांची युद्धे, महान नेते एवढ्यापुरता मर्यादित नसतो, असा विचार पुढे आला.
- तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले.
- या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केला.
अॅनल्स प्रणाली :
- राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच 'अॅनल्स प्रणाली' असे म्हणतात.
- 'अॅनल्स' (Annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे; तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे; असे मानणारी 'अॅनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी विसाव्या शतकात प्रथम विकसित केली. अॅनल्स प्रणालीमुळे इतिहासलेखनास एक निराळीच दिशा प्राप्त झाली.
(३) स्त्रीवादी इतिहासलेखन :
- स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.
- इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.
- त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.
- त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.
- स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.
- १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.
२) सीमाँ-द-बोव्हा :
९ जानेवारी १९०८ रोजी फ्रान्समध्ये जन्मलेली सीमाँ-द-बोव्हा ही प्रसिद्ध कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञानाची अध्यापिका होती. तिच्यावर अस्तित्ववादी विचारसरणीचा प्रभाव होता. तिने अनेक कादंबऱ्या लिहिल्या. तत्त्वज्ञानावर अनेक ग्रंथ लिहिले. स्त्रीला 'पुरुषप्रधान जगात पुरुषी मूल्यांच्या चौकटीत राहावे लागते, तिला स्वत:च्या मूल्यांची निर्मिती करता येत नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अर्थ देणे स्त्रीला अवघड जाते', असे बोव्हा हिचे मत होते. या तिच्या मतामुळे स्त्रीवादी इतिहासलेखनाला बळकटी आली; तसेच इतिहासलेखनात स्त्रियांच्या लेखनाचा अंतर्भाव केला गेला.
युरोपातील महत्त्वाचे विचारवंत :
१) रेने देकार्त (इ.स. १५९६ ते १६५०)
देश –फ्रान्स
ग्रंथ - डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
विचार / माहिती:
- ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे.
- एखादी गोष्ट सत्य आहे, असे खात्रीने प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये.
रेने देकार्त :
'आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक' म्हणून देकार्तला ओळखले जाते. तत्त्वज्ञानाप्रमाणेच त्याने गणितातही मोलाची भर घातली, ज्ञानाची तर्कशुद्ध व भक्कम पायावर उभारणी केली. त्याने स्वीकारलेल्या पद्धतीचे चार नियम होते :
(१) ज्याची ओळख पटलेली नाही, ते सत्य म्हणून स्वीकारायचे नाही.
(२) समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढ्याच भागांत करायचे.
(३) आधी छोट्या समस्येचा मग कठीण समस्येचा अशा क्रमाने विचार मांडायचा.
(४) समस्येचा सर्वांगीण विचारविमर्श करावा. हीच पद्धती पुढे गणित भूमिती या विषयांत वापरली गेली. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना प्रकाशकिरणांच्या दिशेत होणारा बदल, या नियमांचे गणितीय विश्लेषण हे त्याचे मौलिक संशोधन होते.
२) व्हॉल्टेअर (इ.स. १६९४ ते १७७८)
देश –फ्रान्स
ग्रंथ - कॅन्डिड हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
विचार / माहिती:
- इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य व घटनांचा कालक्रम यांवरच लक्ष केंद्रित करू नये.
- तत्कालीन समाजपरंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे.
- इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा.
- व्हॉल्टेअरला 'आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' असे म्हणतात.
व्हॉल्टेअर (२१ नोव्हेंबर १६९४ - ३० मे १७७८) :
थोर फ्रेंच साहित्यिक, विचारवंत व तत्त्वज्ञ. फ्रान्सच्या राजघराण्याशी संबंधित व्यक्तीवर उपरोधपूर्ण कविता लिहिल्याने त्याला वर्षभर बॅस्टिल तुरुंगात ठेवले होते. तेथेच त्याने 'अदीप' नावाचे नाटक लिहिले. ते पुढे रंगभूमीवर बरेच गाजले. पुढे त्याला फ्रान्समधून हाकलून देण्यात आले. तो इंग्लंडला गेला. शेक्सपियरच्या नाटकांचा त्याने अभ्यास केला. धार्मिक युद्धांचा अंत घडवून आणणारा इंग्लंडचा राजा चौथा हेन्री याच्यावर त्याने नाटक लिहिले. आधुनिक तत्त्वज्ञानाची पायाभरणी करण्यात व्हॉल्टेअरचा मोलाचा वाटा होता. राजे, युद्धे यांमध्ये इतिहासाला सीमित करण्यापेक्षा समाज, मानवी मन, संस्कृती यांच्या अभ्यासाला त्याने महत्त्व दिले. त्याने अनेक लेखांतून व ग्रंथांतून धर्मगुरू, असत्य, जुलूमशाही यांवर उपरोधप्रचूर टीका केली. धार्मिक सहिष्णुता, भौतिक प्रगती, मानवी हक्क यांच्या प्रस्थापनेसाठी तो झगडला. त्याने इतिहासावर व तत्त्वज्ञानावर ग्रंथ लिहिले. पन्नासेक नाटके, लेख व कथा लिहिल्या. फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणण्यासाठी त्याचे विचार प्रेरक ठरले.
३) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (इ.स. १७७० ते १८३१) :
देश –जर्मनी
ग्रंथ - (१) एन्सायक्लोपीडियाऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस
(२) रिझन इन हिस्टरी
विचार / माहिती:
- ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे.
- इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो.
- इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांनुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे.
- कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारांत करून चर्चेअंती समन्वयात्मक मांडणी करावी, हा द्वंद्ववादी सिद्धांत मांडला.
द्वंद्ववाद.
(१) एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला 'द्वंद्ववाद' असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली.
(२) दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धान्तांतील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात, दोन परस्परविरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते, त्या पद्धतीलाच 'द्वंद्ववाद' असे म्हणतात.
४) लिओपॉल्ड व्हॉन रांके (इ.स. १७९५ ते १८८६) :
देश –जर्मनी
ग्रंथ - (१) द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी
(२) द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी
विचार / माहिती:
- जर्मन इतिहास तत्त्ववेत्ता लिओपॉल्ड रांके याने शास्त्रीयदृष्ट्या ऐतिहासिक घटनांच्या मांडणीवर भर दिला.
- 'द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी' आणि 'द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी' हे त्याचे दोन प्रसिद्ध ग्रंथ होत.
- त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी, हे सांगताना इतिहासातील काल्पनिकतेवर टीका केली.
- एकोणिसाव्या शतकातील इतिहासलेखनाच्या पद्धतीवर रांकेच्या विचारांचा प्रभाव होता.
५) कार्ल मार्क्स (इ.स. १८१८ ते १८८३)
देश –जर्मनी
ग्रंथ - दास कॅपिटल
विचार / माहिती:
- इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो.
- आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर व्यक्तींचे आपापसातील संबंध अवलंबून असतात.
- उत्पादन साधनांचे वाटप सर्व समाजघटकांत समप्रमाणात न झाल्याने समाजात वर्गसंघर्ष उभा राहतो.
- उत्पादन साधने ताब्यात असणारा वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो.
कार्ल मार्क्स.
- कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत एकोणिसाव्या शतकात होऊन गेला.
- त्याने 'दास कॅपिटल' हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने मांडलेला वर्गसंघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो.
- 'मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे' असे त्याने म्हटले आहे.
- इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो,' असे त्याचे मत होते. त्याच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासनव्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आली.
६) मायकेल फुको (इ.स. १९२६ ते १९८४) :
देश –फ्रान्स
ग्रंथ - आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज
विचार / माहिती:
- इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मांडले.
- अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट असते.
- या पद्धतीला त्याने 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे.
- मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरंगव्यवस्था इत्यादी विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला
मायकेल फुको :
- मायकेल फुको हा विसाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता.
- त्याने 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ लिहिला.
- त्याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला.
- पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैदयकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यांसारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला.
COMMENTS