Home एम.एस. बोर्ड SSC/HSC रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan...

रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan

1050
0
Uttam Lakshan Rasgrahan

रसग्रहण : उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण | Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi

काव्यपरिचय :

माणसाला एक वेळ काय करावे हे कळले नाही तरी चालेल; पण काय करू नये हे कळले पाहिजे; म्हणजे तो नेमकी जी गोष्ट करायला पाहिजे ती आपोआपच करील. खरे बोलावे हे समजले नाही तरी चालेल; पण खोटे बोलू नये हे समजले की तो आपोआपच खरे बोलेल. ‘उत्तम लक्षण’ यातून संत रामदासांनी आपल्या साध्या सोप्या शब्दांतून आदर्श (उत्तम) व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. आदर्श (उत्तम) पुरुषाची व्याख्या, संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे. मनुष्याने ‘उत्तम पुरुष’ बनण्यासाठी सत्याच्या मार्गाने जावे, विवेकाने वागावे तसेच सत्कीर्ती वाढवावी असा बहुमोल संदेश त्यांनी प्रस्तुत ओव्यांतून दिला आहे.

कवितेचा भावार्थ :

अधोगतीकडे, विनाशाकडे चाललेल्या समाजाबद्दल अत्यंत कळकळ, तळमळ अंतःकरणात बाळगून समाजाला नित्य प्रगतीकडे, उन्नतीकडे, कल्याणाकडे घेऊन जाण्याचा ध्यास बाळगणारी महाराष्ट्रातील थोर विभूती, संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी, श्रीदासबोधाच्या माध्यमातून सर्वात प्रथम श्रोत्यांना सावध करतात आणि त्यांना उत्तम पुरुषाची ओळख करून देताना म्हणतात की,
श्रोत्यांनी सर्वप्रथम सावध व्हावे आता तुम्हांला कोणत्या गुणांना उत्तम लक्षणे म्हणतात ते सांगतो. ते गुण ऐकल्याने सर्वज्ञपणा म्हणजे काय ते तुम्हांला समजेल. जो गुण आणि अवगुणांना ओळखतो तो सर्वज्ञ. सर्वज्ञता हे विद्वान, उत्तम व्यक्तीचे महत्त्वाचे लक्षण आहे, हे लक्षात ठेवा ।।१।।
व्यवहारातील किंवा परमार्थातील वाट जाणत्या व्यक्तीला किंवा सद्‌गुरूला विचारल्याशिवाय अर्थात त्यांचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय त्या मार्गाने जाऊ नये. न विचारता गेल्यास श्रम, काळ, पैसा यांची हानी आणि कार्यनाश होतो. एखादया झाडाचे फळ कशाचे आहे, ते फळ कोणते आहे, त्याची ओळख पटल्याशिवाय खाऊ नये. खाल्ल्यास आपल्या प्राणास अपाय होण्याचा संभव असतो. रस्त्यावर पडलेली वस्तू तिची पूर्ण चौकशी केल्याशिवाय एकाएकी घेऊ नये. घेतल्यास चोरीचा आळ येईल, नसती संकटे ओढवतील. ।।२।।
लोकांमध्ये वागताना सरळपणा, म्हणजेच आर्जव म्हणजेच लीनता सोडू नये, अनीतीने, वाईट मार्गाने मिळालेले द्रव्य, धन घेऊ नये आणि कधीही, कोणत्याही काळी पुण्यमार्ग, सन्मार्गाचा त्याग करू नये. ।। ३ ।।
तोंडाळ म्हणजेच निरर्थकपणे, सतत भांडण करणारा याच्याशी त्व वाचाळ म्हणजेच व्यर्थ बडबड करणारा, अपशब्द बोलणारा याच्याशी भांडणतंटा करू नये. संत संगतीमध्ये राहून अंतःकरणातील ईश्वराविषयीचे प्रेम कमी होऊ देऊ नये. ।।४।।
आळसाने बसून राहणे, जांभया देणे यांसारख्या गोष्टींत सुख मानू नये, एखाद्याने कोणाची चहाडी केली तरी ती लगेच मनावर घेऊ नये. त्यातील खरेखोटेपणा पाहावा. पक्का शोध म्हणजेच पूर्ण चौकशी केल्यावाचून कोणतेही कार्य करू नये. ।।५ ।।
सभेमध्ये बोलताना लाजू नये; पण बाष्कळ, निरर्थक बडबडही करू नये. त्याचप्रमाणे जीवन जगत असताना काहीही झाले तरी अनाठायी हट्टाला पेटून पैज मारू नये. ।। ६ ।।
आपली स्वतंत्रता मोडते, स्वातंत्र्य जाते म्हणून आपल्यावर कोणाचेही उपकार घेऊच नये; प्रसंगानुसार घेतले गेले तरी ते फेडल्याशिवाय राहू नये. इतरांना पीडा, दुःख, त्रास कधीही देऊ नये. तसेच कोणाचाही विश्वासघात करू नये ।। ७ ।।
व्यापकपणा – सर्व कामातील कुशलता, दक्षता, सावधानता सोडू नये; म्हणजेच मोठ्या मनाने सर्व बाजूंचा विचार करून आपल्या कार्याची सुरूवात करावी. जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी परतंत्र होऊ नये. आपला भार दुसऱ्यावर टाकू नये. ।।८।।
सत्यमार्ग, सन्मार्ग, खरा मार्ग टाकू नये. क्षणभंगूर सुखाच्या प्राप्तीसाठी खोट्या मार्गाने जाऊ नये. तसेच केव्हाही, कधीही खोट्या
गोष्टीचा, खोट्या मार्गाचा अभिमान धरू नये ।।९।।
जीवन जगताना अपकीर्ति होईल अशी कर्मे कधीही करू नयेत. नेहमी सत्कीर्ति वाढीला लागेल अशीच कर्मे करावीत. तसेच उत्तम पुरुषाने जीवनात विचारपूर्वक व सत्यमागनि वागावे. ।।१०।।


प्रस्तुत कवितेचे कवी : संत रामदास.

प्रस्तुत कवितेचा विषय : उत्तम माणसाची लक्षणे.

प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ :

 (i) होड – पैज
          (ii) दृढ  – ठाम.

प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश :

प्रत्येक व्यक्तीने चांगले वागण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी वाईट गुण कोणते व चांगले गुण कोणते हे स्पष्टपणे समजून घ्यावे. प्रत्येकाने उत्तम माणूस बनण्याचा प्रयत्न करावा. यातूनच चांगला व समर्थ समाज निर्माण होतो.

प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार :

प्रस्तुत कवितेत संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे याचे मार्गदर्शन केले आहे. नेहमीच सावध मनाने वागावे.
इतरांना सहकार्य करावे. कोणाशीही कपटाने वागू नये. तोंडाळ, वाचाळ माणसांना टाळावे. आळस झटकून टाकावा. पूर्ण विचार करून वागावे. उपकाराची परतफेड करावी. नेहमी उदारपणाने वागावे. मनाचा मोठेपणा बाळगावा. परावलंबी होऊ नये. नेहमी सत्याने वागावे. कुप्रसिद्धी टाळावी इत्यादी अनेक गुणांचे आचरण करण्यास या कवितेत संत रामदासांनी सांगितले आहे.

कवितेतील ओळींचा सरळ अर्थ :

जसे – अपकीर्ति ते सांडावी सत्कीर्ति वाडवावी ॥
          विवेकें दृढ धरावी वाट सत्याची ।।
उत्तर: रामदास श्रोत्यांना शिकवण देताना म्हणतात- आपली कुप्रसिद्धी टाळावी, चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे. सारासार विचाराने, विवेकशील वर्तन करून ठामपणे सत्याचा मार्ग आचरावा.

प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये :

   कवितेची रचना ओवी या छंदात केलेली आहे. ओवी हा उच्चारणाला सुलभ असा अत्यंत लवचीक रचनाप्रकार आहे.
त्यामुळे या कवितेतील भाषा ओवी या छंदाला साजेशी सुबोध व सर्वसामान्यांना सहज समजेल अशी आहे. म्हणून कवितेची आवाहन शक्ती वाढली आहे. चुकीचे वर्तन व चांगले वर्तन या दोन्ही बाबी समर्थांनी स्पष्ट शब्दांत कोणतीही संदिग्धता न ठेवता सांगितल्या आहेत. समर्थांच्या या रचनेत प्रासादिकता आढळते.

प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :

    मला ही कविता खूप आवडली. कवितेत मांडलेले विचार पटकन पटण्यासारखे आहेत. ही कविता उच्चारताना, वाचताना आनंद होतो. उच्च, उदात्त विचार मनात घोळवल्याने मनही आनंदित होते. सर्व गुण-अवगुण रामदासांनी अत्यंत स्पष्टपणे परखडपणे सांगितले आहेत. कुठेही राज्यांचा बोजा नाही. प्रत्येक शब्दाणीक अर्थ स्पष्ट होत जातो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असलेल्या गुणांचे मार्गदर्शन घडत असल्याने कविता आपली, स्वतःची, स्वतःसाठी असलेली वाटत राहते.

  • दहावी मराठी उत्तमलक्षण कवितेच्या ओळींचे रसग्रहण
  • दहावी मराठी उत्तमलक्षण कविता रसग्रहण
  • उत्तमलक्षण कवितेचे रसग्रहण
  • उत्तमलक्षण कवितेचे रसग्रहण कसे कराल?
  • Uttam Lakshan Rasgrahan 10th Marathi
  • उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here