Home Uncategorized वाट मराठी कथा vaat marathi katha

वाट मराठी कथा vaat marathi katha

0
marathi katha-vaat
marathi katha-vaat

marathi katha – vaat  वाट – मराठी कथा 

                                              – चारुता सागर 
परिचय : दिनकर दत्तात्रय भोसले (१९३९-२०११) विलक्षण प्रत्ययकारी शैलीने आपली कथा फुलविणारे ज्येष्ठ कथाकार, मोजकेच पण अत्यंत उत्कट कथालेखन. ‘नागीण’, ‘मामाचा वाडा’, ‘नदीपार’ हे गाजलेले कथासंग्रह, महाराष्ट्र राज्य शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारांसह इतरही अनेक महत्त्वाचे पुरस्कार. त्यांच्या ‘दर्शन’ या कथेवर ‘जोगवा’ चित्रपटाची निर्मिती. या कलाकृतीला पाच राष्ट्रीय पुरस्कार. वास्तव ग्रामजीवन आणि भटक्या विमुक्तांचे प्रत्ययकारी चित्रण ही ठळक लेखनवैशिष्ट्ये.
प्रस्तुत कथेत पारधी या भटक्या जमातीच्या रानोमाळ भटकंतीची, मरणासन्न क्षणीही मायलेकीची अंतिम भेट होऊ न शकल्याची, कावरीची करुणार्तता काळजाचा ठाव घेते.

दंडोबाच्या घळीला जखऱ्याची वस्ती पडली होती. वस्तीला कवठ्याचा बाजार जवळचा, तरी चार कोसांवरचा. जखऱ्याने ह्या बाजारात सांगावा फोडला होता-
  “भिमा पारध्याला म्हणाव, म्हातारी काय टिकायची न्हाई पार निजून हाई, आणि कावरीला तेवढं पाठवून दे, त्याबिगर म्हातारीचा पण जीव जायाचा न्हाई, जिवात ती आडकूनच हाई म्हण…
कावरी जखऱ्याची भन.
“खरं म्हणतूस? टिकायची न्हाई?”
‘अगदी खरं, न्हाई टिकायची’, या अर्थी जखऱ्यानं मान हालवली होती. जड घसा खाकरून साफ केला होता. भरलेलं डोळं टिपलं होतं. भोवती जमलेले पारधी जड जड झाले होते आणि आपल्याबरोबर जखऱ्याचं दुःख वाहून नेलं होतं.
  त्या दिवशी असेच पारधी कवठ्याच्या बाजाराला आले होते. तिथनं जखऱ्याचा सांगावा पाण्यावर तेलाचा तवंग पसरावा, असा साऱ्या मुलखावर पसरला, जत, मोहोळ ही उगवती दिशा, विंटा-बारामती, पुणे हा उत्तरेचा मुलूख अथणीहून विजापूर. तिथनं पुढं हुबळी, दावणगिरी असा राक्षसमुखी परिसर आणि मिरजेहून निपाणी-कोल्हापूर, त्याच्या पुढं मावळतीची कोकणपट्टी, तरी अधल्या मधल्या चिपळूण, चाकणसारख्या ठळक ठळक गावच्या बाजारांत जमलेल्या पारध्यांच्या कानांवर हा सांगाबाबोलावा जाण्यास पंधराएक दिवस लागलेच.
 तुळजापूरच्या बाजाराला कावरी आणि तिचा दाल्ला आला होता. जवळची चार कातडी विकली. बाजारहाट केला. आता एकदा सगळ्यांस्नी भेटून जावं म्हणून तो गावाबाहेरच्या लिंबाच्या झाडाकडे वळला. तिथं एक एक पारधी जमत होता.दिवस कलला होता. गोडवा खात खात एकदा वार्ता कळाली, म्हणजे जायला मोकळं.
“भिमा ये.” शिवऱ्या बोलला. त्याला बसाय जागा करून दिली.
“गोडवा घे. तिला दे.”
भिमानं मूठभर गोडवा घेतला, कावरीला दिला, आपण घेतला.
“भिमा एक सांगावा हुता रं, सोलापूरच्या बाजारात मला मिळाला; तुझी सासू पडलिया, लई झालंय म्हणं, कावरीला बोलावलंय, लावून दे जा. येऊ दे भेटून.”
कावरीच्या तोंडातला गोडवा तोंडातच राहिला. भिमानं हात आखडला; आणि गोडवा एकदम गिळत म्हणाला, “कुण्या मुलखात हाई ती ?”
सोलापूर वघंनं आलेला पारधी त्यो मुलूख डोळ्यांपुढं आणत आणत म्हणाला, “पंढपुरापुढं बघ सांगुला, त्यानंतर कवठा आणि तिथंच कुठंशी एक डोंगूर हाई बघ. त्याच्या थापडीला पाल टाकलंय, पर मिरजेच्या पल्याड जायच न्हाई,आल्याड्च”.
 “जास्ती असल्याशिवाय सांगावा यायचा न्हाई. भेटून किती वरसं झाल. अशीच उभ्या उभ्या गाठ पडली हुती. अगदी झालं असंल.” कावरीचं डोळं ओलावलं.
 “मग जातीस? ये जा बघून. मी राहतो इथंच ही चार पोरं घेऊन.” भिमा पायातलं कडं चाळवत म्हणाला.
“एका जागी राहून खातासा काय ?”
“ बघतो काय तरी. तू जा, ये जा भेटून. म्हातारी अगदी झाली असंल.”
कनवटीला लावलेल्या रुपय रूपच्या दोन नोटा काढून तिच्या पुढं केल्या. त्या तिनं कमरेला खवल्या. पोटच्या पोराला काखेला मारलं, उरल्या चिल्यापिल्यावानं नजर फिरवली. पोटच्याच्या पाठचं जे होतं, ते केविलवाणं बघू लागलं. त्याला पोटाशी धरून म्हणाली,
“लगी येतं हं, कुठं लांब जाऊ नकोस, आक्कासंगंच खेळ.”
पुन्हा एकवार पक्षिणीगत पिलांवरनं नजर फिरवली नि वरलीकडच्या वाटंला लागली.
एक. दोन. तीन. असे दिवसामागून दिवस. पहाटेपासून झांझड पडेपर्यंत चालायचं. किती वाहने यायची. जायची. ही आपली पायान अंतर तोडत असायची. तिला वाटायचं. लवकर पोचाय होवं. आई वाट बघत असंल. तिचा पाय बिगीनं उचलायचा; पण वाट काही ओसरायची नाही. लांबच्या लांब पसरलेली असायची. तरी पंढरपूर, सांगुला मागं टाकला आणि हातीद्च्या रानात शिरली.
एक मजल मारावी; टप्पा टप्पा करावा; कधी सरळ वाटेनं, कधी आडवाटेनं, कुणी कडनं जवळ यावं, आणि जसं जसं जवळ यावं, आईच्या आठवणीने व्याकुळ व्हावं. भेटल का आई? पडेल का गाठ? एकदम सापडेल का तळ? का वाट बघून…. नि मनातला हा विचार…. असलं वाईट वंगाळ… छ्या छ्या! आई नाही सोडून जायाची. मला सांगावा धाडलाय अन् जाईलच कशी? न्हाई न्हाई. कधी न्हाई. माझ्या माय तू…. माझ्या बये तू…. मी आले गं…. थांब आई, थांब……खंड न्हाई. अंतर न्हाई. पुढं पुढं दूर जाणारी वाट आणि त्यावर चालणारी तिची पावलं… … तरातरा.
  पाचव्या दिवशी तिला दंडोबाची रांग दिसली. आठ-दहा मैलांची निळसर रांग, तोंडावरच्या दिवसाला हातानं झाकून तिनं पुढं पाहिलं; जवळ डोंगरघळीला गाव दिसलं. त्या गावात मग शिरली. भेटेल त्याला विचारू लागली,
“बाबा, हितं एखादं पारध्याचं पाल उतरलंय का?”
“बाई, तुला एखादं दिसलं का ?”
“न्हाई गं बाई, कुठं दिसलं!”
“बाळ तुला?”
“न्हाई बाई.” म्हटल्यावर निराश व्हायचं.
मग शिवारात पाहावं, माळामाळाने फिरावं, कोण भेटल त्याला विचारावं,
“हितं पारध्याचं एखादं दुसरं पाल उतरलंय का ?”
न्हाई म्हटलं की, पुन्हा हताश व्हावं; अगदी निराधार, पुरात पाय अंतराळी झाल्यागतं. दुसरा सबंध दिवस तो दंडोबाचा परिसर धुंडाळत फिरली; दऱ्याखोऱ्यात, काट्याकुट्यात, पण कुठं काय तलास लागेना.खिन्न होऊन बसली. पोटात अन्नाचा कण नाही. पायांत चालण्याचा ताण नाही, अंग सारं उसवून गेलंय, पण बसून न्हाई भागायचं. हुडकलं पाहिजे, ती माझी वाट बघत असेल.
ती उठली, पुढं निघाली, एक म्हातारा शेतकरी आपल्या शेतात हराळी खांदत होता, त्याला विचारलं
“बाबा, हितं कुठं पारधी उतरलेत का?”
म्हाताऱ्यानं कुदळ थांबवून तिच्याकडे पाहिलं. कपाळाचा घाम टिपला अन् म्हणाला,
“तू पारध्याची का?”
अगदी सुकल्या आवाजात तिनं उत्तर दिलं.
“व्हय दादा, मी पारध्याचीच जखऱ्या पारध्याची भन.”
मग तिथं बघ, एक पालं पडलं हुत पारध्याचं; पंधरादी हुतं, हाय का बघ जा. त्या बघ खालच्या वघळीला…”
  गेलेला जीव एकदम तिच्या पायांत आला, ती लगालगा धावली, बुबळ लहान-मोठी करून पाहिलं. पण कुठं दिसंना. तशीच पुढं झाली आणि एकाएकी थांबली, पाल उतरल्याच्या खाणाखुणा दिसल्या. चूल, चुलीची दगडं; मारलेल्या पाखरांची पखं, जनावराची हाडं, पालाखालची गवत काढलेली जागा, फाशाच्या मोडक्या खुट्या, कामट्या आणि पालाच्या मेखा उपसलेल्या भेगा. त्या पलीकडं ठोकलेल्या देवाच्या पताका, सगळ्या खुणा साजिवंत. जशाच्या तशा. एका फासंपारध्याच्या पालासारख्या. हे पाल तिच्या भावाचं. खात्री पटत चालली. आणखी नजर लांबली. दोनतीन एक कासरं खालच्या ओघळीला, आणि विजेसारखं लखकन् काळीज हाललं, तशी धावली. क्षण एक थांबली-अगदी खुळ्यावानी, मग एकदम हंबरडा फोडला गुरावानी.
“माझ्या बये गं… … माझे आये गं….. माझे माय गे.. माझी वाट सुदीक पाहिली न्हाईस, मला सांगावा धाडलास आणि तू निघून गेलीस, आता कुठं भेटू? कशी भेटू? आई मी आलीया, तुला भेटाय आलीया. नुसतं तोंड तरी दाखव, माझ्या संगं बोल तरी एखादा सबूद…. हे माझे हरणे…. माझी वाट सुदीक पाहिली न्हाईस…गं.”
 गहिवरून ती रडू लागली. घालून घेऊन लागली. पुरलेली माती उधळू लागली. उराला लावून बडवू लागली. मातीच्या ढिगाऱ्यावर डोके आपटू लागली.
 असल्या आडरानी कुणी कसला आक्रोश मांडलाय? कुणाला काय झालंय? बघावं म्हणून गुराखी पोरं पळत आली, जळणाच्या बाया धावत आल्या, मघाचा तो शेतकरी आला आणि त्या सगळ्यांना बघून तिला जास्तच भरून आलं, आभाळ फुटल्यासारखं डोळं गळू लागलं. बायकांचंही डोळं ओलावलं. ऊर दाटून आला. त्या पाणी टिपत टिपत ओल्या आवाजात म्हणाल्या,
“लेक व्हय तू? तुझी तिनं लई वाट बघितली, डोळ्यांत जीव अडकवून तशी होती. गेल्या बुधवारी गेली, जीव जाता जात नव्हता. आम्ही बघतच हुतो. जाता येता. गाठ पडायचीच नव्हती…….”
 घडीभरानं सगळी आल्या वाटनं निघून गेली, गठुळ्यातनं बांधून आणलेलं आईला खायला त्या मातीच्या ढिगावर ठेवलं, कावकाव करत रानकावळं भवती जमलं. ती बाजूला झाली आणि पिंडावर बसल्यावानी कावळं त्यावर नाचू लागलं.
किती कष्टानं तिनं वाट तुडविली होती, इथवर आली होती, गाठ-भेट राहिली. निदान तिच्या प्रेतावर तरी डोळ्यांनी दोन थेंब पडायला हवं होतं. दु:ख हलकं व्हायला हवं होतं. तासाभरानं ती उठली, मूल काखंला घेतलं, हळूहळू चालायला लागली.
 दिवस बुडून गेला होता, अंधार पसरत होता. दिशा आकारहीन होत होत्या. आणि आता तिच्यापुढं ना वाट होती, ना त्या वाटंवर पडणारी पावलं तिची होती.

                                                      (नागीण)
marathi katha-vaat

आमचा  Whats App ग्रुप खालील प्रमाणे आहे जॉईन व्हा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

ग्रुप नाव – www.marathistudy.com

www.marathistudy.com Group Join links
www.marathistudy.com-1 Join  whatsapp.jpg
Previous articleजन पळभर म्हणतील – मराठी कविता jan palbhar mhntil marathi kvita
Next articleNAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY QUESTIONS (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here