१. वंद्य ‘वन्दे मातरम् ’
ग. दि. माडगूळकर (१९१९-१९७७) : प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार.‘जोगिया’, ‘चैत्रबन’, ‘वैशाखी’, ‘पूरिया’ इत्यादी गीतसंग्रह; ‘गीतगोपाल’, ‘गीतसौभद्र’ ही काव्यनिर्मिती; ‘कृष्णाची करंगळी’,‘तुपाचा नंदादीप’ हे कथासंग्रह; ‘आकाशाची फळे’, ‘उभे धागे आडवे धागे’ या कादंबऱ्या प्रसिद्ध. भारत सरकारने ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
आपल्या अलौकिक प्रतिभेमुळे ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग. दि . मा. यांचे प्रखर राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीर भारतपुत्रांच्या कृतज्ञतेविषयीचे हे गीत आहे. प्रस्तुत गीत ‘चैत्रबन’ या काव्यसंग्रहातून घेतले आहे.
वेदमंत्रां हून आम्हां वंद्य ‘वन्दे मातरम् ’ !
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यांत लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र ‘वन्दे मातरम् ’ !
याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले
शस्त्रहीनां एक लाभो शस्त्र ‘वन्दे मातरम् ’
निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला झुंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्ग लोकी जाउनी
गा तयांच्या आरतीचे गीत ‘वन्दे मातरम् ’ !
प्रस्तुत त गीत हे केवळ काव्यानंदासाठी समाविष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हणावे.
गीत ऐका व तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करा.
गीत गायन : श्री.राजेंद्रकुमार गोंधळी
श्री.निशांत गोंधळी
कोल्हापूर
कवितेचा भावार्थ:
राष्ट्रप्रेमाने भारलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतात – वेदांच्या मंत्रांपेक्षाही ‘वंदे मातरम!’ हा जयघोष आम्हां भारतीयांना वंदनीय आहे, आदरणीय आहे.
(स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये) या भारतवर्षात भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा धगधगता स्वातंत्र्यसंग्राम (यज्ञ) झाला. त्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणांची आहती पडली. लाखो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्या या पवित्र बलिदानाने ‘वन्दे मातरम्!’ हा मंत्र निर्माण केला. सिद्ध केला. ‘वन्दे मातरम्!’ या मंत्राने त्या वेळी मुर्दाड झालेली व स्वाभिमान हरवून बसलेली राष्ट्रीयता जागृत झाली. सारे भारतीय खडबडून जागे झाले, कायम शांतीचा पुरस्कार करणारे भारतीय, संगिनधारी सशस्त्र, क्रूर इंग्रजी जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढले. त्या झुंजीमध्ये निःशस्त्र असणाऱ्या भारतीयांना ‘वन्दे मातरम्!’ हा एकच महामंत्र शस्त्रासारखा लाभला होता.
स्वातंत्र्यलढ्यामध्ये ज्या देशभक्तांनी ‘वन्दे मातरम्’ हा मंत्र निर्माण केला व तोच वर्तनात आणून परकीय सत्तेशी झुंज दिली. जे राष्ट्रभक्त या रणकुंडात प्राणार्पण करून हुतात्मे झाले ते देव होऊन स्वर्गलोकी गेले. त्यांना देवत्व प्राप्त झाले. त्यांच्या बलिदानाची आरती म्हणजेच हे ‘वन्दे मातरम्!’ गीत आहे. आपण ते गाऊ या.
आधुनिक वाल्मीकी-गदिमा
शारदेच्या साहित्य दरबारातील एक अग्रणी नाव म्हणजे गजानन दिगंबर माडगूळकर. गदिमा म्हणजे मूर्तिमंत प्रतिभा. गदिमा यांच्या सृजनशील प्रतिभेचा उदंड ठेवा महाराष्ट्राला लाभला आहे. ओव्या -अभंगांपासून काव्याचे अनेक प्रकार गदिमांच्या प्रतिभेची साक्ष देतात. ‘गीतरामायण’ हे दीर्घ काव्य श्रीरामप्रभूंच्या जीवनकथेचा काव्यबद्ध आविष्कार आहे. अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे ‘गीतरामायण’ म्हणजे गदिमा व सुप्रसिद्ध संगीतकार, गायक सुधीर फडके यांनी घडवलेला चमत्कार होय.
पुणे आकाशवाणीने दर आठवड्याला एक गीत याप्रमाणे सलग छप्पन्न आठवडे संपूर्ण ‘गीतरामायण’ प्रसारित करून आकाशवाणीच्या इतिहासात एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली आहे. गीतरामायणाच्या निर्मितीमुळे आधुनिक वाल्मीकी म्हणून मान्यता पावलेले गदिमा हे थोर शब्दप्रभू होते. गीतरामायणातील एकेक शब्द हा चपखल शब्दरचनेचे मूर्त उदाहरण आहे. १.४.१९५५ रोजी प्रथम प्रसारित झालेल्या गीतरामायणातील पहिल्या गीताने सर्व रसिकांना एक अनोखा श्रवणानुभव दिला. गदिमांनी त्यांच्या एकटाकी लेखनशैलीने ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’ हे पहिले गीत लिहिले.हे गीत भूप रागावर आधारित आहे. या गीतासाठी सुधीर फडके (बाबूजी) यांनी अप्रति म चाल तयार केली. आपल्या शब्दांनी डोळ्यांस मोर प्रसंगदृश्ये निर्माण करणारे गदिमा व सुमधुर चाल लावून गाणारे सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेने रसिकांना जिंंकले.
‘राम जन्मला ग सखी, राम जन्मला’ या गीताची जन्मकथा अत्यंत उत्कंठा वाढवणारी आहे. तेव्हाचा हा प्रसंग.गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर यांच्याच शब्दांत –
‘‘गावाकडची आठवण येतीय वाटतं?’’ चहाचा कप हातात घेऊन इतक्या वेळ अस्वस्थ गदिमांकडे पाहात उभी असलेली माझी आई त्यांना म्हणाली. तेव्हा तंद्रीतून जागे होत गदिमा तिला म्हणाले, ‘‘अगं गीतरामायणातलं पुढचं गाणं
उद्याच बाबूजींना दिलं पाहिजे.’’ संध्याकाळी गदिमा एकटेच लांबवर अगदी थेट रेंजहिल्सपर्यंत पायीच फिरून आले.आल्या आल्या च आईला म्हणाले, ‘आज मागील दारी तुळशीवृंदावनाच्या कट्ट्यावरच माझी बैठक घाल.’त्यांच्या सांगण्याप्रमाणे आईने तुळशीवृंदावनाच्या कट्ट्यावरच गादी घालून त्यावर पांढरीशुभ्र चादर घातली. पाठीमागे लोड-तक्के ठेवले. शेजारी बदकाच्या आकाराचे त्यांचे पानसुपारीचे तबक ठेवले. जवळच चंदनाच्या सुगंधाची उदबत्ती लावून ठेवली. ‘पपा मागच्या अंगणात लिहायला बसलेत. अजिबात दंगा करू नका’ अशी आम्हांला तंबी देऊन, ती पुन्हा रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. जाताना नेमाकाकाला तुळशीवृंदावनाजवळ एक ट्यूबलाईट लावून ठेवायला सांगायची मात्र ती विसरली नाही.
संंध्याकाळ उलटत चालली. तुळशीवृंदावनावर छाया धरणाऱ्या अशोक वृक्षाची पाने पश्चिमेकडून सुटलेल्या उन्हाळी वाऱ्यामुळे सळसळू लागली, तरी गदिमांच्या पॅडवरील कागदावर एक शब्दही लिहून झाला नव्हता. आईने
पुन्हा एकदा त्यांना चहा दिला आणि ‘‘तुम्ही खाली बसला आहात तोपर्यंत मी वरच्या मजल्या वरील तुमची बैठकीची खोली आवरून येते. काही लागलं तर हाक मारा’’ असे सांगून ती नि घून गेली. त्यालाही आता बराच वेळ झाला होता. मध्यरात्र उलटून गेली तरी गदिमांकडून काहीच निरोप येत नाही हे पाहिल्यावर तिने खाली तुळशीवृंदावनाजवळ बसलेल्या गदिमांना विचारले, ‘‘अहो, जेवणाबिवणाचा काही विचार आहे की नाही? जवळजवळ बारा वाजून गेले आहेत, झालं का नाही तुमचं लिहून?’’ ‘‘अग एवढी घाई कशाला करतेस? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्माला यायचेत, तो काय अण्णा माडगूळकर जन्माला येतोय थोडाच? वेळ हा लागणारच!’’ गीतरामायणाच्या ५६ गाण्यां तील रामजन्माचे गीत पहाटे-पहाटे पूर्ण झाले तेव्हा गदिमांनी त्यांच्यासाठी जागत, पेंगुळलेल्या माझ्या आईला ते वाचून दाखवले, तेव्हा त्यांच्याविषयीच्या अभिमानाने तिचा ऊर भरून आला.
पेंगुळल्या आतपात, जागत्या कळ्या
‘काय काय’ करत पुन्हा, ऊमलल्या खुळ्या
उच्चरवे वायू त्यास, हसून बोलला
राम जन्मला ग सखी, राम जन्मला…
mast