Home १० वी बालभारती बोलतो मराठी पाठ स्पष्टीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolto Marathi swadhyay

बोलतो मराठी पाठ स्पष्टीकरण स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolto Marathi swadhyay

0
bolto marathi
.

डॉ. नीलिमा गुंडी (१९५२) :
मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ज्ञ आणि लेखिका. त्यांची ‘अक्षरांचा देव’, ‘निरागस’ हे बालसाहित्य; ‘देठ जगण्याचा’, ‘रंगांचा थवा’ हे ललित लेखसंग्रह; ‘भाषाप्रकाश’, ‘भाषाभान’, ‘शब्दांची पहाट’ हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी ३५ पुस्तके प्रकाशित आहेत. २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या ‘संवेदना’ या २०११ आणि २०१२ सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते, याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास, मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे यापाठातून स्पष्ट होते.

.

परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको : ‘‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’’
नवरा : ‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाक घरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशावेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार देणे’ हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ‘खस्ता खाणे’ मध्ये खस्ता हा खाद्य पदार्थ नाही, हे माहीत आहे ना? तसेच ‘कंठस्नान घालणे’ हा वाक्प्रचार युद्धा विषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून ‘अंघोळ घालणे’, असा शब्दश: अर्थ नाही. ‘खांद्याला खांदा लावणे’ (सहकार्य करणे) आणि ‘खांदा देणे’ (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एका ऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. ‘अक्कलवान’ म्हणजे हुशार; पण ‘अकलेचा कांदा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोयकी फिरकी घेतोय, हेच आपल्याला कळणार नाही.
क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून कायनवीन अर्थकळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का?

भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. ‘मोरांबा’ या शब्दातल्या ‘मोरा’चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते.
‘कदर करणे’ असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. ‘कद्र’ या अरबी शब्दापासून ‘कदर’ (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., ‘अनुसया’ असे नाव नसून ते ‘अनसूया’ असे आहे. ‘अन् + असूया’ अशी त्यातील संधी आहे. मनात असूया(मत्सर) नसलेली अशी ती ‘अनसूया’ हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच ‘जराजर्जर’ या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, ‘वार्धक्याने विकल झालेला!’ यातील ‘ज’चे उच्चार तालव्य(ज्य) आहेत. तर जरा(थोडे), जर (कलाबतू) या शब्दातील ‘ज’चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. ‘सूतकताई’ हा शब्द जर ‘सूतक ताई’ असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच ‘अक्षरश:’ हा शब्द लिहिताना‘अक्षर शहा’ असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का?
‘पुराणातली वांगी पुराणात’ या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्टआली आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती ‘पुराणातली वानगी पुराणात.’ वानगी म्हणजे उदाहरणे. पण ‘वानगी’ झाली ‘वांगी’ आणि आपण शोधत राहिलो वांग्या विषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते.
काही वेळादोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.
उदाहरणार्थ,
१. राजाचे ‘कलेवर’ प्रेम होते.
२. अपघातस्थळी कडेला एक ‘कलेवर’ पडले होते.
येथे पहिल्या वाक्यात ‘कलेवर’ हे शब्दरूप ‘कला’ या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात ‘कलेवर’ हे नाम असून त्याचा अर्थ ‘शव’ असा आहे.
आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषाही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
आपली भाषाही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायलाहवे. उदा., आतापाऊस पडत आहे. ‘पाऊस पडणे’ याघटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.
१. पावसाने स्वत: जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
२. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या ‘मॉर्निंग वॉक’च्या बेतावर पाणी पडले.
अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…’ असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.
(छात्र प्रबोधन, दीपावली विशेषांक २०१६)

.

बोलतो मराठी पाठावरील स्वाध्याय व पाठाचे स्पष्ठीकरण  व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
  Link Click GIF by Buzzstock
बोलतो मराठी पाठावर आधारित online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
  Link Click GIF by Buzzstock

Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

Previous articleबातमी लेखन मराठी इयत्ता दहावी batmi lekhan in marathi 10th
Next articleआजी : कुटुंबाचं आगळ मराठी : कुमारभारती इयत्ता १० वी aaji kutumbacha aagal
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here