
दृष्टिकोन – drusthikon
एक दिवस एक गंभीर आजार असलेला माणूस, व्हील चेअरवर बसून एका इस्पितळात दाखल झाला. जिथे अजून एक रुग्ण खिडकीजवळच्या पलंगावर विश्रांती घेत होता.जेव्हा त्या दोघांमध्ये मैत्री झाली, तेव्हा तो खिडकीजवळचा रुग्ण नेहमी खिडकी बाहेर बघायचा आणि त्या अंथरुणाला खिळलेल्या माणसाला खिडकीबाहेरच्या वातावरणाचे स्पष्ट वर्णन पुढचे काही तास आनंदाने सांगायचा.एखाद्या दिवशी तो इस्पितळाच्या पलीकडे असलेल्या बगीच्यामधल्या झाडांच्या सौंदर्याचे वर्णन करायचा, आणि वाऱ्यामुळे झाडांची पाने कशी नाचायची, बागेतील लोकांची असणारी वर्दळ, खेळणारी, बागडणारी मुले याचे वर्णन करायचा. तसेच इस्पितळातल्या लोकांचे रोजचे चालणारे काम क्रमाक्रमाने वर्णन करून ते आपल्या मित्राला सांगायचा.
पण जसाजसा काळ जाऊ लागला, तसतसा तो अंथरुणाला खिळलेला माणूस त्याच्या मित्राने केलेले वर्णन आणि सौंदर्य न बघता आल्यामुळे स्वतःच्या असमर्थतेवर निराश व्हायला लागला. कालांतराने त्याचा मित्र त्याला आवडेनासा झाला आणि तो त्याचा खूप द्वेष करायला लागला.
एका रात्री खोकल्याची जबरदस्त उबळ येऊन त्या खिडकीजवळच्या रुग्णांनी शेवटचा श्वास घेतला. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदतीसाठी रुग्णालयात बझर बसवलेल्या होत्या. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णाने मदतीसाठी बटन दाबण्यापेक्षा काहीही न करणेच पसंत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्या रुग्णांनी त्याला खिडकी बाहेरचे दृश्य सांगून इतका आनंद दिला होता, त्याला मृत घोषित करण्यात आले. आणि इस्पितळाच्या खोली बाहेर नेण्यात आले. दुसर्या अंथरुणाला खिळलेल्या माणसाने ताबडतोब आपल्याला खिडकीजवळच्या पलंगावर हलविण्याची विनंती केली आणि ती विनंती तेथे काम करणाऱ्या नर्सने ताबडतोब मान्य केली. पण जेव्हा त्याने खिडकीबाहेर पाहिलं तेव्हा बाहेरचे दृष्य पाहून त्याला फार धक्काच बसला, खिडकीबाहेर एक मोठी विटांची भिंत होती. त्याच्या खोलीत राहणाऱ्या त्याच्या मित्रांनी अतिशय प्रेमाने, त्याच्या दुःखात आणि अडचणीच्या काळात त्याला बरे वाटावे, आनंद मिळावा म्हणून त्याच्या कल्पनाशक्तीतून आश्चर्यकारकरित्या बाहेरचे दृश्य त्याला रंगवून सांगितली होती. नि:स्वार्थी प्रेमापोटी तो असे वागला होता.
इतरांसाठी आपला दृष्टीकोन उदार हवा…